भोगावती साखर कारखाना ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : पाचशे कोटींचा जुळवलेला अहवाल, जाणीव पुर्वक पाडलेली रीकव्हरी, २०१७/१८ गळीत हंगामातील २०० रुपये द्या, मजूर पुरवठा संस्थांच्या आड काढलेला पगार, सभासद वाढीला झालेला विरोध आणि शिक्षण प्रसारक सभासदांच्या मालकीचे करा या मागणीने आजची भोगावतीची वार्षिक सर्वसाधारण सभा आरोपांच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील होते.
मागील गळीत हंगामात भोगावतीच्या सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखवून पाच लाख सोळा हजार टन ऊस पाठवून आमच्यावर विश्वास ठेवला. ऊस बिलासह तोडणी ओढणीची बिले देऊन आम्ही तो विश्वास सार्थ ठरवला. याहीवर्षी पिकवलेला सर्व ऊस भोगावतीस पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन भोगावतीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केले ते भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
सुरुवातीस अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ऑलम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांचे अभिनंदन व दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला. या सर्वसाधारण सभेकडे सभासदांनी पाठ फीरवली. अहवाल वाचन सचिव उदय मोरे यांनी केले.
भोगावतीत काँग्रेसने राष्ट्रवादी व शेका पक्षाला जवळ घेत राजकारणाचे गणित जुळवलं मात्र भोगावतीवरील कर्जाचे गणित जुळवणार काय असा आरोप करत शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस तीन वर्ष भोगावतीला फुकट घालवला तरी भोगावतीवरील कर्ज फिटणार नाही एवढं कर्ज भोगावतीवर करून ठेवलं त्यासाठी ठोस उपाययोजनांची कोणालाच फिकीर नाही असा थेट आरोप स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी केला.
भोगावती कारखान्याने नेमलेल्या लेखापरीक्षकांनी पाच कोटींचा कर्जाचा ताळेबंद जुळवून सभासदांच्या माथी मारला आहे. तोटा लपवण्यासाठी हा उद्योग केला. सभासदांना ज्यादा ऊस दर द्यावा लागेल या भीतीपोटी मोलॅसिस मध्ये साखर सोडून जाणीवपूर्वक साखरेची रिकवरी पाडण्याचा उद्योग या संचालक मंडळांनी केला आहे. सन २०१७/१८ या गळीत हंगामातील दोनशे रुपये प्रमाणे ऊस बिल दिलेले नाही या ऊस बिलापोटी आठ कोटी रुपये सभासदांचे देणे लागत असून ते सात ते आठ कोटी बुडवायला निघाला आहात असा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी केला.
ठेकेदारांच्याकडून रोजंदारीवर नोकर भरती करून मजूर पुरवठा संस्थेच्या आडून भोगावतीत ७५ लाखांचा पगार काढला तर विनाकारण खरेदी केलेल्या मालावरील व्याज शेतकऱ्यांच्या माथी पडत आहे हाच संचालक मंडळाचा पारदर्शी कारभार का असा सवाल अजित पाटील यांनी उपस्थित केला. अशोकराव पवार पाटील हंबीरराव पाटील, एम आर पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जनार्दन पाटील, अजित पाटील, आण्णाप्पा चौगले, अमर डोंगळे, निवास पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
भाऊ कुठबी बसा, पुढच्या वर्षी सगळ्यांनी एकत्र खालीच बसायचं हाय
भोगावतीची वार्षिक साधारण सभा सुरु असताना माजी उपाध्यक्ष अशोकराव पाटील सडोलीकर सभास्थळी आले असता आम्ही कुठं बसायचं अस विचारताच अध्यक्ष शिवाजीराव पाटील स्वागत करत म्हणाले, भाऊ कुठबी बसा त्यात काय एवढ, पुढच्या वर्षी जाहीरात काढावी लागणार असल्याने आम्ही वर बसलेली सर्व मंडळी तुमच्या सोबत खाली बसणार आहोत. त्यावेळी बॅरेकेट लावावी लागणार नाहीत मात्र जाहिरात कशाची काढायची याची चर्चा सभास्थळी होती.
तोडणी ओढणीसाठी प्रोत्साहन योजना
तोडणी ओढणी करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. प्रोत्साहन योजणेअंतर्गत कार्यक्षेत्रात ऊस तोड करणाऱ्या सर्व वाहणधारकांना ५२ टक्के कमीशन देणार आहोत तर कारखाना यंत्रणेत काम करणाऱ्या वाहणधारकांना विविध योजना देण्यात येतील असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.