पुजारी, व्यावसायिक, ग्रामस्थांकडून श्री चरणी ऐंशी किलो चांदी अर्पण
सोमनाथ दादर्णे
सुपर न्युज नेटवर्क
वाडी रत्नागिरी : ‘दख्खनचा राजा’ जोतिबा मंदिरातील मुख्य चौकटीस ऐंशी किलो चांदीने मडवण्यात आले आहे. डोंगरावरील जोतिबा देवाचा दरबार चांदीचा झाला असून मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज चंदेरी राज दरबाराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरात राज्यातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असणाऱ्या दख्खनचा राजाचा राज दरबार चंदेरी व्हावा, या संकल्पनेतून जोतिबा डोंगरावरील पुजारी (गुरव), स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांच्या लोकवर्गणीतून ऐंशी किलो चांदी वापरून मुख्य गाभाऱ्याच्या चौकटीस चांदीचा मुलामा चढविण्यात आला आहे. या सजावटी मुळे मुख्य गाभारा खुलुन दिसत आहे. यावेळी सर्व देवतांना वस्त्रे अर्पण, रुद्राभिषेक,चांदी कळस शोभायात्रा, संकल्पपुर्ती व मंत्रोच्चार पठण करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार माधवी शिंदे, सरपंच राधा कृष्णात बुणे, श्री पुजारी, व्यावसायिक, ग्रामस्थ उपस्थित होते.