मार्चपासून प्रती टन पन्नास रुपये जादा दर, भोगावतीचे सहा लाख टन गाळपाचे उद्दीष्ट : अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात ३२०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मार्च नंतर गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पन्नास रुपये प्रतिटन जादा देणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजु कवडे, कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पत्रकार परिषदेस कारखान्याचे ज्येष्ठ संचालक केरबा पाटील, अविनाश उर्फ नंदुभाऊ पाटील, मारुतराव जाधव, प्रा. ए. डी. चौगले, शिवाजी कारंडे, अभिजित पाटील, सेक्रेटरी उदय मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले, कारखाना अर्थिक अडचणीत असतानाही शिस्तबध्द धोरणावर विश्वास ठेवुन सभासदांसह सर्व घटकांचे सहकार्य लाभत आहे. आतापर्यत ऊसबिले, तोडणी ओढणीबिलांसह अन्य देयके अदा केली आहेत. यावर्षीसाठीही पहिली उचल ३२००रुपये प्रतिटन देत असुन शासन धोरणाप्रमाणे उर्वरित रक्कमेसाठीही आम्ही कटिबद्ध आहोत. संचालक व कर्मचाऱ्यांनी आपला असणारा ऊस हा दुसऱ्या कारखाना देणे म्हणजे या साखर कारखान्याची प्रतारणा आहे आणि म्हणूनच अन्यत्र ऊसपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही कठोर निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणीही केली. त्याबद्दलचा विश्वास सभासदांकडून आमच्याकडे व्यक्त होतोय. यंदाच्या हंगामासाठी सहा लाख टन गाळपाचे उद्दीष्ट सभासद, कर्मचारी, हिंतचिंकांच्या पाठबळावर पुर्ण करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.