रविवारी कोल्हापूर पर्यंत महारॅली काढून छ. शाहूंना भेटणार!
सुपर न्युज नेटवर्क
राधानगरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका अखेर स्पष्ट केली. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना उघड समर्थन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
रविवारी सकाळी राधानगरी- भुदरगड मधील हजारो समर्थकांसह शेकडो वाहनांची महारॅली काढून कोल्हापुरात नवीन राजवाड्यात छ. शाहूंची भेट घेऊन ए. वाया पाटील पाठिंबा देणार आहेत. मात्र मी राष्ट्रवादी सोडलेली नाही केवळ लोकसभा निवडणुकीसाठी छत्रपती शाहूंना पाठिंबा देत असल्याचे एवाय यांनी सुपर 24 न्युजशी बोलताना स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ हे सातत्याने आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेले मेव्हणे माजी आमदार के पी पाटील यांनाच झुकते माप देत असल्याची सल ए. वाय. यांच्या मनात होती. मागील आठवड्यापासून ए. वाय. यांचे व्याही आणि भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर, अरुणराव इंगवले, बाबा देसाई, प्रताप कोंडेकर यांनी बिद्री येथे ए. वाय. यांची भेट घेऊन महायुतीमध्ये सक्रिय होण्याची विनंती केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी भूमिका जाहीर करेन असे ए वाय यांच्याकडून सांगण्यात आले होते. ए. वाय. यांच्या निर्णयाची जिल्हात उत्सुकता होती.
महायुतीमध्ये नाराज असलेल्या ए. वाय. पाटील व शाहुवाडीचे रणवीरसिंह गायकवाड राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे दिसून येत आहे. या दोघांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यशस्वी झाले आहेत.
रविवारी छत्रपती शाहूंना पाठिंबा
राधानगरी -भुदरगड मधून ए. वाय. पाटील
रॅलीने नवीन राजवाड्यावर छत्रपती शाहूंना पाठींबा देणार आहेत. यावेळी आ. पी एन पाटील आणि आ.सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत.