
के. पी. पाटील, ए. वाय.पाटील यांच्यासह नवज्योतसिंह देसाई यांच्यामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच
सुपर न्युज नेटवर्क
कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांचा विजयी अश्वमेध रोखण्यासाठी महाविकास आघाडीतुन कोणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी के. पी. पाटील, ए. वाय.पाटील यांच्यासह नवज्योतसिंह देसाई यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच आहे. के. पी. पाटील हे चार दिवस मुंबईत तळ ठोकून होते. ए. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनाप्रमुख उद्वव ठाकरे यांची भेट घेत उमेदवारीच्या शर्यतीत आहोत हे दाखवून दिले आहे. तर कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याने नवज्योतसिंह देसाई ही दावेदार मानले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जावुनही के. पी. पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. ए.वा.पाटीलांनी उघड विरोध करत लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटील व स्वर्गीय पी. एन. पाटील यांचा शब्द प्रमाण मानुन विनाअट शाहू महाराज यांना पांठिबा देत राधानगरी मतदार संघात मताधिक्य देत पी. एन. व सतेज यांचा विश्वास सार्थ ठरवला होता. कॉंग्रेसच्या वाट्याला मतदार संघ गेल्यास नवखा चेहरा या भुमिकेतुन डॉ. नवज्योतसिंह देसाई पर्याय ठरू शकतात. मात्र जनसंपर्क, विकास कामांचा पाठपुरावा आणि शेतकरी कष्टकरी मतदारांच्या पाठबळावर विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांचा अश्वमेध रोखणार काय याकडे लक्ष लागले आहे.