संघटनेचे बळ शाहू की मंडलिकांना ?
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोणाच्या पाठीमागे स्वाभिमानीची ताकद उभी करायची याबाबत शेतकरी संघटना व पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. संघटनचे बळ कोणाच्या पाठीमागे उभे करायचे याचा आदेश झालेला नसल्याने संघटनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेस, उद्धवसेनेसह भाजप शिंदे शिवसेनेने तगडे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर मतदार संघातील कार्यकर्त्यांचे बळ कोणाच्या पाठीमागे उभे करायचे याबाबत मत मतांतरे आहेत. शेतकरी संघटनेचा निर्णय काय होतो याकडे लक्ष लागून आहे.
हातकणंगले मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीकडूनही आपापले उमेदवार रिंगणात असल्याने ते या पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना तगडे आव्हान आहे. यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कोल्हापूरमध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी हे अद्याप समजलेले नाही. कुणाला पाठिंबा द्यावा याबाबत ही अद्यापही वक्तव्य झालेले नाही. त्यामुळे यांच्याकडे असलेल्या मताचा गठ्ठा कोणाच्या पारड्यात पडतो हेही लक्षवेधी आणि महत्त्वाचे ठरणारे आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी शाहू छत्रपती यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या होत्या मात्र पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या विरोधातच काँग्रेस सह उध्दवसेना तर भाजप शिंदे सेनेने उमेदवार दिल्याने शेट्टी समर्थक नाराज आहेत.
“हातकणंगले लोकसभा मतदार संघात आमचे नेते मा. खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडी व महायुतीच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्नच येत नाही.”
प्रा. डॉ. जालंदर पाटील
प्रदेशाध्यक्ष
स्वाभिमानी पक्ष
“अद्याप मतदान कोणाला द्यायचे हे स्पष्ट झालेले नसून आमचे नेते माजी खासदार राजू शेट्टी जे सांगतील त्यांच्या पाठीशी आम्ही ताकद लावू.”
जनार्दन पाटील
जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.