भोगावतीची फेब्रुवारी अखेरची ६३ कोटी
८६ लाख रुपयांची ऊसबिले बँकेत जमा : अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांची माहिती
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : शाहूनगर परिते (ता करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या ऊस गळीत हंगामातील दिनांक १६ जानेवारी ते २९ फेब्रुवारी अखेरच्या ऊसाचे बिल प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे ६३ कोटी ८६ लाख रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर मंगळवारी वर्ग केली आहेत. तसेच आतापर्यंत १३७ कोटी २७ लाख रुपये ऊस बिलापोटी ऊस उत्पादकांना दिल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी मंगळवारी दिली.
कारखान्याने यंदाच्या ऊस गळीत हंगामातील ऊसासाठी प्रतिटन ३२०० रुपये ऊसदर जाहीर केला होता. दरम्यानच्या काळात गाळप झालेल्या १ लाख ९९ हजार ५६४ मेट्रीक टन ऊसाची ६३ कोटी ८६ लाख ७ हजार ५२३ रुपयांची रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहेत. त्यामध्ये १६ ते ३१ जानेवारी अखेर च्या ७१ हजार ८२१ टन व १ ते २९ फेब्रुवारी अखेरच्या १ लाख २७ हजार ७४३ टन ऊस बिलांचा त्यामध्ये समावेश आहे. कारखान्याने यापूर्वी २ लाख २९ हजार ४१४ मेट्रीक टन ऊसाचे ७३ कोटी ४१ लाख रुपये पुर्वीच वर्ग केले आहेत.तसेच ऊर्वरीत ऊसबिले लवकरच जमा केली जातील असेही श्री पाटील व श्री कवडे यांनी सांगितले.
कारखान्याने यंदाच्या ऊस गळीत हंगामात १२२ दिवसात ५ लाख १० हजार ६८९ टन ऊसाचे गाळप करून ६ लाख २९ हजार ३२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. तर सरासरी साखर उतारा १२.३२ टक्के एवढा आहे.कारखान्याचे सर्व संचालक मंडळ काटकसरीने कारभार करीत असून ऊस उत्पादकांना व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. आगामी ऊस गळीत हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादकांनी आपला संपुर्ण ऊस कारखान्याकडे नोंद करून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले आहे. यावेळी सर्व संचालक मंडळासह प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व सचिव उदय मोरे आदी उपस्थित होते.