
नागेश्वर हायस्कूल सलग दुसऱ्यांदा राधानगरी तालुक्यात प्रथम : जिल्ह्यासाठी निवड
संदीप लाड
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन मध्ये राशिवडे बु (ता. राधानगरी) येथील श्री नागेश्वर हायस्कूलने सलग दुसऱ्यांदा राधानगरी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा स्तरावर नागेश्वर हायस्कूलची निवड झाली.
सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्र स्तरावर आणि तालुकास्तरावर शाळा तपासणी पथकाकडून भेट देत पहाणी करण्यात आली होती. शाळेचे मुल्यांकन तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात आले होते. यामध्ये शालेय उपक्रम, पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी, शालेय कामकाज, शैक्षणिक संपादणूक या निकषावर तपासणी करण्यात आली होती. या अभियानात राधानगरी तालुक्यात सलग दुसऱ्यांदा नागेश्वर हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.
यासाठी राधानगरी तालुका गटविकास अधिकारी संदीप भंडारे, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, कौलव केंद्र प्रमुख आर. जी. पाटील यांच्यासह विद्या प्रसारक मंडळ राशिवडेचे अध्यक्ष वि. ज्ञा. पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव किरण निल्ले यांच्यासह संचालक शिवाजी लाड, राजेंद्र पाटील, सुभाष लाड यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक एस. एल. चौगले, पर्यवेक्षक डी. बी. टिपूगडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.