
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : तुम्ही आमदार करा, मी आबीटकरांना नामदार करून तुमच्याकडे पाठवतो
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : आमदार प्रकाश आबिटकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची जनतेला शंभर टक्के खात्री आहे. दोन महिन्यापूर्वी धामणी धरण प्रकल्पावर झालेल्या विराट सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘तुम्ही आमदार करा, मी आबीटकरांना नामदार करून तुमच्याकडे पाठवतो. या दिलेल्या शब्दामुळे येथील मतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला शब्द पाळणार काय याकडे लक्ष लागले आहे.
हॅट्रिक साधलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघासाठी हजारो कोटींची कामे आणली. बंड केले तेंव्हाच त्यांना मंत्रीपद मिळेल ही संधी होती. मात्र त्यांनीही नम्रपणे नाकारून माझ्या मतदारसंघासाठी अधिका अधिक निधी द्या. असे वचन घेतले त्याचा मतदार संघाला फायदा झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राधानगरी दौरा झाला. बरीच वर्षे रेंगाळलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या घळ भरण्याच्या कार्यक्रमाला भर पावसात ही त्यांनी हजेरी लावली. हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ”माझ्या सोबत असलेल्या सर्वात लाडक्या आमदारांमध्ये प्रकाश आबिटकर यांचा समावेश होतो. अतिशय कामाचा माणूस आहे. माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आलेत तेव्हा विकास कामे आणि मतदारसंघाचे प्रश्न घेऊनच आलेत. त्यामुळे तुम्ही आता पुन्हा त्यांना आमदार करा मी त्यांना नामदार करूनच मतदारसंघात पाठवतो. ‘हे माझे वचन आहे’ असा शब्द त्यांनी दिला होता. यानंतर लगेचच तासाभरात गारगोटी येथे झालेल्या सभेमध्ये ही त्यांनी याचा पुनरुचार केला होता. तिसऱ्यांदा आमदार प्रकाश आबिटकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शिवाय राज्यांमध्ये महायुतीची सत्ताही येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांना दिलेला शब्द पाळणार काय याकडे लक्ष लागले आहे.
आमदार प्रकाश आबिटकर हे अभ्यासू आणि जनतेत मिसळणारे आमदार आहेत. त्यांनी हॅट्रिक केली आहेच आता त्याचा मंत्रीपदावर दावा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळतील आणि आमदार प्रकाश आबिटकरांना संधी मिळेल याकडे लक्ष लागून राहिले आहे.