न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनी यंत्रणा सुरू ठेवता येणार
ध्वनीप्रदूषण झाल्यास कायदेशीर कारवाई
पारंपरिक वाद्यांचा वापर करा
लेसर लाईट वापरास परवानगी नाहीच
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : न्यायालयीन नियम, सामाजिक सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करा. आम्हाला आनंदाच्या आडवे यायचे नाही मात्र कायद्याच्या चौकटीत राहून आनंद साजरा करा असे आवाहन शाहुवाडी विभागाचे उप अधिक्षक आप्पासो पवार यांनी केले. ते राशिवडे येथील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी सरपंच संजीवनी पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे प्रमुख उपस्थिती होते. पोलीस दल, राखीव पोलीस दल यांनी मुख्य बाजारपेठेतून संचलन केले.
उप अधिक्षक आप्पासो पवारपवार यांनी गणेशोत्सव असो अथवा कोणताही सार्वजनिक उत्सव नियमांचे उल्लंघन न करता उत्साहाने साजरे झाले पाहीजेत. काही वेळा नाईलाजाने पोलीस प्रशासनास कटु निर्णय घ्यावे लागतात. नागरिक आणखी पोलीस यांच्यातील सलोखा कायम राहील याची दक्षता घ्यावी. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सहभागी व्हावे, अश्लिल नृत्याला बगल देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे करा असे त्यांनी सुचवले.
राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी राशिवडे येथील विसर्जन मिरवणुक पहायला गर्दी उसळते असे सांगत सर्वच मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. भाग्यलक्ष्मी उद्योग समुहाचे युवानेते दिलीप पाटील यांनी कोणत्याही गणेशोत्सव मंडळाकडून अनुचित प्रकार घडणार नाही यांची ग्वाही दिली. यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अशोक पाटील, संजय पवार, मानसिंग पाटील आदी उपस्थित होते. उपसरपंच अजिंक्य गोनुगडे यांनी स्वागत केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले. मुख्य बाजारपेठ, गावतलाव सह अन्य मार्गावरुन पोलीसांनी संचलन केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलीसांनी राशिवडे येथे संचलन केले.