राशिवडे अपघात : पती जागीच तर पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू : कुटुंब उध्वस्त
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : राशिवडे येळवडे (ता. राधानगरी) दरम्यान दुचाकी व मालवाहतूक टेंपोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये पती पत्नी जागीच ठार झाले. संजय वसंत कांबळे (वय ४५) व त्यांची पत्नी सुरेखा संजय कांबळे (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. अपघात मंगळवारी सायंकाळी सात वाजता झाला.
घटनास्थळावरच मिळालेली माहिती अशी, राशिवडे बाजारपेठेतून दिपावलीचा बाजार करून सायंकाळी सातच्या सुमारास हे दांपत्य पुंगाव (ता. राधानगरी) येथे आपल्या गावी दुचाकी क्रमांक एम एच ०९ ए एम १७५८ वरुन जात होते. येळवडेहून राशिवडेच्या दिशेने येणाऱ्या मालवाहतूक टेंपो क्रमांक एम एच ०९ सी यु ८६२९ याची समोरासमोर जोरदार धडक होवून दुचाकीवरील संजय कांबळे जागीच ठार झाले. अपघातात टेंपो मोठ्या चरीत जावून उलटला. सुरेखा कांबळे यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. संजय कांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. राधानगरी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोलमजुरी, ऊसतोड, सेंट्रींग काम करणाऱ्या संजय कांबळे यांना चार मुली. घरी अंध आई, एक विवाहित, तीन शिक्षण घेणाऱ्या मुली राहतात. सुरेखा कांबळे याही रोजंदारी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. आज त्या परीते येथे रोजंदारीवर दिपावली साठी लाडू बांधणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी संजय गेले होते. घरी जात असताना दिपावलीचा बाजार घेवून ते दोघे घरी निघाले होते मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. ऐन दिवाळी सनात आई वडील अपघातात गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले.