ह्यो थोरल्या महाराजांचा अपमान !
असं कोल्हापूर बोलतयं
सुपर न्युज नेटवर्क
भोगावती : लोकसभेचे रणांगण तापत असतानाच विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना थेट आव्हान देत हे दत्तक आहेत रक्ताचे वारस नव्हे अशी बोचरी टीका केली. अर्थातच ही टीका कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीतही लागू होते. यामुळे हे राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे सांगता येणे कठीण आहे. राजर्षी शाहू महाराज हे कागलच्या घाटगे घराण्यातून दत्तक कोल्हापूरच्या गादीला आले असल्याने ही टीका राजे समरजीत घाटगे यांनाही आपसूकच लागू होते अशी जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. आगा थोरल महाराज बी दत्तकच हाईत मग ह्यो तेंचा अपमान नव्हं. अशी सामान्य जनतेकडून विचारणा होत आहे.
कोल्हापूर जिल्हा आणि इथल्या जनतेला “राजर्षी शाहू महाराज म्हणजे अस्मिता, दैवत”. देशाचा विकास कोणत्या दिशेने न्यावा यांचे राजर्षी शाहू महाराज म्हणजे दीपस्तंभ. सामाजिक सलोखा, बांधिलकी आणि सहिष्णुता यांचे ते मार्गदर्शक. कोल्हापूरच्या गादीवर कागल घराण्यातून राजर्षी शाहू महाराज हे दत्तक आले. तसाच प्रकार सध्याच्या विद्यमान श्रीमंत शाहू महाराजांच्या बाबतीत आहे, तेही दत्तक आहेत. मात्र मंडलिक यांनी याच मुद्द्याला हात घालून “शाहू महाराज हे दत्तक आहेत ते थेट वारसदार नव्हेत” अशी आव्हानात्मक टीका केली. यामुळे कोल्हापूरकरांची अस्मीता जागी झाली आहे.
केवळ उमेदवार नव्हे तर दत्तक आलेल्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांना ही टीका थेट लागू होते. हे कोल्हापूरकरांना खपण्या सारख नाहीच. अर्थातच ज्या घराण्यातून त्यांना दत्तक घेतले ते कागलचे घाटगे घराणे . अर्थात समरजीत घाटगे व त्यांच्या भगीनी शौमिका यांनाही हे आव्हान लागू होते. ते यात थेट उडी घेणार काय ? की आपल्या घराण्याच्या इभ्रतीपेक्षा त्यांना पक्ष मोठा हे दिसेल.