महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांची महापुराशी झुंज : तीस गावांचा वीज पुरवठा सुरळीत
सूपर न्यूज नेटवर्क
राशिवडे : दोन दिवसापासून तीस गावांचा बंद पडलेला वीज पुरवठा जिगरबाज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, पूरात पडलेली झाडे या सर्वावर मात करत पुर्ववत केला. सुमारे वीस तास वीज कर्मचारी अक्षरशः पुराशी झुंज देत होते. दोन दिवसापासुन अंधारात गडप झालेली तीस गावे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने उजळून निघाली.
आवळी बुद्रुक येथील वीज उपकेंद्राला मुडशिंगी आणि राधानगरी कडून 33 केव्हीचा वीजपुरवठा होतो. गेल्या चार दिवस सुरू असलेल्या वादळी पावसामुळे या दोन्ही वाहिन्यांवर झाडे पडली होती. घोटवडे येथे वेळूचे बेट 33 केव्ही वर पडल्याने तिथून संपर्क बंद झाला होता. आणि दुसरा संपर्क राधानगरी वरून सुरू होता त्यातही कळंकवाडी या गावाजवळ झाड उंन्मळून वाहिन्यावर पडले आणि वाहिन्या तुटल्या त्यामुळे या परिसरातील तीस गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. याची तातडीने दखल घेऊन कुठे कुठे अडथळे आहेत हे तपासणे बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू केले. आधी घोटवडे येथे वेळूचे बेट काढण्यास सुरुवात झाली. आज दिवसभर आवळी खुर्द -कळंकवाडी येथे पुरुषभर महापुराच्या पाण्यात यंत्रणा कामाला लागली.
महापुरातून, ऊसातून वाट काढत घटनास्थळापर्यंत पोहचून वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर पुराशी झुंज दिली. घोटवडे येथील वाहिनी दुरुस्त करून वीज पुरवठा सुरू केला. घोटवडे पासून आवळी बुद्रुक पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर तारळे पासून येळवडे पर्यंतच्या वाहिणीचे काम हातात घेतले. सेवा, जिद्द आणि लोक भावना विचाराने झपाटलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे दिव्य पेलले.
कंथेवाडी : महापुराच्या पाण्यातून जाऊन वीज दुरुस्तीचे खडतर काम करणारे महावितरणचे धाडसी वीज कर्मचारी.