
वृद्ध शेतमजूर महीलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून : खुनाचे कारण अस्पष्ट
सुपर न्यूज नेटवर्क
राधानगरी : नरतवडे (ता.राधानगरी) येथील श्रीमती आक्काताई केशव रामाणे (वय ६५) या महिलेचा शेतात दगडाने ठेचून खुन करण्यात आला. आईला शोधण्यासाठी गेलेला त्यांचा मुलगा बाळासो रामाणे याला आई ऊसाच्या सरीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळली. घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नरतवडे येथील डोंगरालगतच्या टेंबुर नावाच्या शेतातील ऊसाला पाणी पाजण्यासाठी आक्काताई रामाणे या गेल्या होत्या. त्या परत न आल्याने दुपारी ३ च्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला शोधण्यासाठी गेला असता त्यांची आई ऊसाच्या सरीत छिन्नविच्छिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसली. ही घटना त्यांनी गावचे पोलीस पाटील व राधानगरी पोलीस ठाण्यात कळविली. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. पंचनामा करुन मृतदेह सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यांच्या मागे मुलगा, सुन, नातु असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घिर्डीकर, हवालदार कृष्णात यादव, शुभांगी जठार, कृष्णात खामकर, दिगंबर बसरकर, किरण पाटील, रघुनाथ पोवार करत आहेत.
खुनाचे गूढ वाढले
मृत अक्काताई रामाणे यांच्या गळ्यातील सोन्याचा गुंड गायब असुन दोन्ही कानातील सोन्याची फुले कानातच होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असता तर सर्व सोनं घेवून चोरट्याने पोबारा केला असता. अशी चर्चा घटनास्थळी होती. चोरी का अन्य कारणांमुळे खून झाला यामुळे खूनाचे रहस्य वाढले आहे. नरतवडे येथील जोतिर्लिंग चैत्र असल्याने गावचा पाळक होता. याची संशयित आरोपीला माहिती होती का याचाही तपास सुरू आहे.