
दलित, बहुजन व अल्पसंख्याक समाजाचा वापर करून भावनांशी खेळणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून द्यावीच लागेल
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : भारतीय संविधान व लोकशाही धोक्यात असल्याच्या अफवा पसरवून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना वास्तवाची जाणीव करून द्यावीच लागेल. आंबेडकरी समाजाच्या प्रभोधनासाठी आंबेडकरवादी समाज, पक्ष, संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा २३ अॉक्टोंबर बुधवार दुपारी एक वाजता परिते ता. (करवीर) येथील हरिप्रिया मंगल कार्यालयात आयोजित केला आहे. जेष्ठ आंबेडकरवादी नेते प्रा. शहाजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंगळवारी दिली आहे.
आंबेडकरवादी चळवळीचे अभ्यासक व विचारवंत प्रा. डॉ. विजय काळेबाग यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. मेळाव्यात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तर रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आंबेडकर) च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, रिपाई (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष विश्वास तरटे, रिपाई (गवई गट)चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांच्यासह दलित सेना, दलित महासंघ, रिपब्लिकन सेना तसेच विविध आंबेडकरवादी पक्ष व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भारतीय संविधानाचा केवळ निवडणुकीत वापर करून दलित, बहुजन व अल्पसंख्याक समाजाच्या भावनांशी खेळणाऱ्यांना रोखण्यासाठी मजबूत धोरण या मेळाव्यात ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.