ऑलिंपिक नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे यांची
“भोगावती”वर हत्तीवरून मिरवणूक व सत्कार
अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
स्वप्नीलला १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर
कार्यक्षेत्रातील सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : भारताचा स्टार नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे यांनी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत कास्यपदक पटकावल्याबद्दल भोगावती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढून यथोचित सत्कार समारंभात एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये भोगावती कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्था, शिक्षण संस्था, तरुण मंडळे व सभासद व सर्वच कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कांबळवाडी गावचे स्वप्निल कुसाळे रहिवासी आहेत. त्यांचे वडील सुरेश कुसाळे कारखान्याचे सभासद आहेत. स्वप्निल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण कारखान्याच्या राजर्षी शाहू पब्लिक स्कूलमधून घेतले आहे. त्यामुळे भोगावती साखर परिवाराशी कुसाळे कुटुंबाची नाळ जुळलेली आहे. तर स्वप्नील कुसाळे हा शिक्षणा पासून भोगावती परिवाराशी जोडला गेला आहे. आशियाई स्पर्धेतील यशाबद्दल भोगावती कारखान्याच्या वतीने स्वप्नीलचा एक वर्षापूर्वी सत्कार केला होता. त्यावेळी दिवंगत आमदार व कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष पी. एन. पाटील सडोलीकर यांनी स्वप्नील आगामी आँलिंपीक स्पर्धेत जर कोणतेही पदक मिळविलेस तर तुझी भोगावती परिसरातून हत्तीवरून मिरवणूक काढून यथोचित सत्कार करु असे जाहीर केले होते. पी. एन. साहेबांनी स्वप्नील ला दिलेला हा शब्द त्यांच्या पश्चात आम्ही पूर्ण करीत असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
परिते गावच्या पाठीमागील पेट्रोल पंपापासून ते भोगावती कार्यस्थळावरील राजर्षी शाहू महाराज पुतळ्यापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर भोगावती परिसराच्यावतीने कारखान्यामार्फत यथोचित सत्कार समारंभ होईल. यावेळी त्यांना कारखान्याच्यावतीने १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील वाशी पासून भोगावती व तेथून कांबळवाडी गावापर्यंत प्रत्येक गावातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी स्वप्नीलचे उत्सफुर्त स्वागत व सत्कार करावा. तसेच अन्य गावच्या ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी भोगावती येथील कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच कार्यक्षेत्रातील लेझीम, ढोल, बेंझो व झांजपथक आदी वाद्यवृंद मंडळांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी संचालक रघुनाथ जाधव, पांडुरंग पाटील, सुनिल खराडे, शिवाजी कारंडे, काटकर, डी. आय. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व सचिव उदय मोरे उपस्थित होते.