आमदार पी एन पाटील यांच्यावर आधार हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया : अतिदक्षता विभागात उपचार
सुपर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील ॲस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. अकरा वाजता ॲस्टर आधार रुग्णालयाकडून पत्रकार परिषद घेऊन आमदार पी एन पाटील यांच्या उपचाराबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सकाळी आमदार पी. एन. पाटील घरातील बाथरूम मध्ये तोल जाऊन पडल्याने त्यांच्या हाताला व डोक्याला दुखापत झाली होती. त्यांना तातडीने येथील ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला असल्याचे दिसून आले होते. काल रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते बाथरूम मध्ये असताना त्यांचा तोल जाऊन पडल्याने त्यांच्या हाताला व डोकीला मार लागला होता.
ॲस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.