एकनाथ शिंदेनी शब्द पाळला : आमदार प्रकाश आबिटकर मंत्री पदांची शपथ घेणार
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिलेच मंत्रीपद येत आहे. मध्यरात्री झालेल्या चर्चेतून आमदार प्रकाश आबिटकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. आज त्यांचे कार्यकर्ते सायंकाळी होणाऱ्या शपथविधीसाठी नागपूरला रवाना झाले. यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला कोण मंत्री असणार याबाबत उत्सुकता होती. मोठमोठे या स्पर्धेत असतानाच आमदार प्रकाश आबिटकर यांना संधी मिळणार काय याबाबत साशंकता होती. अखेर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आणि येथील जनतेला दिलेला शब्द पाळला. काल मध्यरात्री बारा वाजता आबिटकर यांना फोन करून ‘शपथविधीसाठी हजर राहा ! तुम्ही शपथ घ्यायची आहे. ‘ असा संदेश दिला आणि कार्यकर्ते कामाला लागले. ते राज्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे खातेवाटप मात्र नंतर होईल.
आठच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे जनतेला दिलेला शब्द पाळणार काय? आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्री करणार काय? अशा आशयाची बातमी 24 सुपर न्यूज मधून आम्ही प्रसिद्ध केली होती या बातमीला न्याय मिळाला.