
परिते येथे रस्ता ओलांडताना आराम बसच्या धडकेत महिला जागीच ठार
सुपर न्यूज नेटवर्क
भोगावती : कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर परिते (ता. करवीर) येथे भरधाव आराम बसने रस्ता ओलांडत असणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात श्रीमती अंजनी रंगराव पाटील (वय ६५) या जागीच ठार झाल्या.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अंजनी पाटील या आज सकाळी सव्वा सातच्या वेळी कामानिमित्त जात होत्या. याच वेळेला रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून पणजी कडे जाणाऱ्या भरधाव आराम बस क्रमांक (टी एस १२ यु ई ०३८२) ने धडक दिली. या धडकेत श्रीमती अंजनी पाटील जागीच ठार झाल्या.
परीते येथे गावालगतच हा भीषण अपघात झाल्याने घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करत एकेरी वाहतूक सुरू केली.