जलाशयाच्या बॅक वॉटर मध्ये बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू : पाण्याचा अंदाज आला नसल्याने एकमेकांना वाचवताना तिघांचा दुर्दैवी अंत
सुपर न्यूज नेटवर्क
राधानगरी : राधानगरी धरण जलाशयाच्या बॅक वॉटर मध्ये बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतामध्ये एक तरुण, तरुणी व अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. काल सायंकाळी हे तिघे पर्यटनासाठी आले होते. सतीश लक्ष्मण टिपूगडे वय ३५ रा. भैरीबाबर सद्या रा. कागल, अश्विनी राजेंद्र मालवेकर वय ३२ रा सावर्डे (ता. कागल) सध्या राहणार तळंदगे (ता. हातकणंगले), प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर (वय १३) तळंदगे (ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, बुधवारी मयत तिघे राधानगरी येथे चारचाकी गाडी घेऊन पर्यटनासाठी आले होते. सतिश टेपूगडे याने नातेवाईकांना जेवन करून ठेवा आम्ही फिरून येतो असा निरोप देवून जलाशयाच्या बॅक वॉटर जवळ गाडी थांबवून पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज आला नसल्याने बुडत असताना एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात तिघेही बुडाले असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. बराच वेळ सतिश परतला नाही म्हणून शोधाशोध केली असता चारचाकी गाडी, कपडे, चपला घटनास्थळी आढळून आल्या व पाण्यात सतिशच्या मृतदेह तरंगताना दिसून आला. तर अश्विनी मालवेकर व प्रतिक्षा मालवेकर यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आले. राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत.