
गोकुळ : दुध वाहतुक सुरळीत करण्यासाठी संचालक उतरले रस्त्यावर.
सूपर न्यूज नेटवर्क
राशिवडे : कोल्हापूर जिल्ह्यात गेले आठ दिवस अतिवृष्टीमुळे महापुराची तीव्रता वाढली असून अनेक मार्ग पाण्याखाली आहेत. गोकुळच्या दूध संकलनावर महापूराचा परिणाम झाला आहे. आज सकाळी राशिवडे परिसरात रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने दूध वाहतूक करणाऱ्या गाड्यांची वाहतूक कोलमडली. दुध वाहतूक सुरळीत करण्यासाठी गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले थेट रस्त्यावर महापुराच्या पाण्यात उतरल्याचे दिसून आले.
धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी तालुक्यात बहुतांश बंधाऱ्यावर महापुराचे पाणी आल्याने अनेक रस्ते बंद आहेत. परिणामी काही गावातील दूध संकलन ठप्प झाले आहे. दूध संकलनाची वाहने पर्यायी मार्गाने गोकुळ प्रकल्प आणि चिलिंग सेंटरना पाठवण्याचे काम गोकुळच्या संकलन विभागाचे अधिकारी आणि सुपरवायझर करत आहेत.
आज सकाळी राशिवडे ते परिते बंधाऱ्याच्या दरम्यान महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दूध वाहतुकीच्या गाड्यांना अडथळा आला. गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी संकलन विभागाच्या अधिकारी आणि सुपरवायझर यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन दूध वाहतुकीचे टेम्पो सुरक्षितपणे पुरातून मार्गस्थ करण्याचे नियोजन केले. यावेळी त्यांच्यासोबत सहायक दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगले, मुकुंद पाटील, सुपरवायझर निलेश पाटील, सतिश पोवार, अतुल पाटील, सुकुमार पाटील यांचा समावेश होता.