
राष्ट्रवादीचे शिवाजी भाट यांची अनपेक्षित माघार : येळवडे उपसरपंचपदी रूपाली सारंग
सुपर न्युज नेटवर्क
राशिवडे : येळवडे (ता .राधानगरी ) येथे आज नाट्यमयरीत्या उपसरपंच निवड झाली. स्पर्धेत असलेल्या ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भाट या गट नेत्यालाच अनपेक्षितरित्या माघारी घ्यावी लागली. यामुळे उपसरपंचपदी रूपाली कृष्णात सारंग यांची निवड झाली .अध्यक्षस्थानी सरपंच ओंकार पाटोळे होते.
या ग्रामपंचायतीवर सात विरुद्ध तीन अशी सत्ता आहे. तीन सदस्यांचा सरपंच असल्याने सत्तेची कसरत आहे. उपसरपंच अपर्णा कुपले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर आज निवड होती. यासाठी सात सदस्यांमधील शिवाजी भाट यांचे एक नाव आले. ते सत्तेतील ए . वाय. पाटील गटाचे नेते आहेत. मात्र ऐनवेळी सुभाष पाटील यांच्या कडून दोन सदस्यांतून सौ. सारंग यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांना विरोधकांच्या गटातील सुष्मिता मिसाळ यांनी सूचक म्हणून सही केली. साहजिकच उरलेल्या तीन सदस्यांचा त्यांना पाठिंबा मिळाला. बलाबल पाच पाच असे झाल्यानंतर ज्या बाजूला सरपंच आहेत त्या बाजूचे पारडे एकमताने जड होणार असे लक्षात येतात श्री. भाट यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे उपसरपंच पदाची बिनविरोध माळ सारंग यांच्या गळ्यात पडली . याप्रसंगी सर्व सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक रणजीत जोंग यांनी निवड प्रक्रिया हाताळली. उपसरपंच यांचा सत्कार सुष्मिता मिसाळ व मावळत्या उपसरपंच अपर्णा कुपले यांनी केला.
ऐनवेळी घडलेल्या या बदलामुळे एका युवा नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला . त्यांच्या मुलांनी कांही काळ गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .